संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
08-01-2024
गुरुदेवच भक्ताला भवदुःखातून पार करतो. गुरुशिवाय कोणीही भवसागर पार करु शकत नाही. गुरुदेवाच्या चरण कमलाची रज, धुलीकण आपल्या मनरुपी आरसा पवित्र करतो. आपले मन गढूळ झालेले शुद्ध होते. गुरुदेवच काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष देतात. आपल्या मनातील वासनाचे बीज मुळापासून मिटविण्याची शक्ती गुरुदेवाच्या चरणरज मध्ये आहे.
गुरुनाम की नैया हमें, भव दुःख से तरवायगी ।
गुरुकी चरणरज ही हमें, मन भौर से हरवायगी ।।
गुरु-प्रेम की बरखा हमें, सत् ज्ञानको बतलायगी ।
गुरुकी कृपा हमको हमारे, सुखमें मिलवायगी ।।
गुरुदेव ईश्वरापेक्षा कमी नसतात तर ईश्वराची ओळख गुरुदेवच करतात. जो अज्ञानाचा अंधार दूर करुन ज्ञानाचा प्रकाश देतात. सगुण ब्रम्ह म्हणजेच गुरु. गुरुचे ज्ञान म्हणजे ब्रम्हज्ञान. तो चैतन्य रूप आहे. श्री गुरुहून श्रेष्ठ असे काहीच नाही.
गुरु तो आदि अंतीचा, गुरु अधिकार शांतीचा ।
गुरु तो निवृत्त भ्रांतीचा, प्रगटला देह ताराया ।।
खरा गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देतो. गुरु शिष्याची पात्रता पाहूनच ज्ञान देतात. पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे. आयुष्यात येणारे संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने, घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्या विना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. "गुरु बिन ज्ञान कहाॕसे लावू?" हेच खरे आहे.
गुरु जवळून माहिती घेऊन आपल्यात असणारा परमात्मा प्राप्त करावा लागतो. मात्र एक फार मोठे गुढ आहे की, गुरुचा व्यवसाय करणाऱ्या गुरुचा जगभर सुकाळ असला तरी किल्लीवाला गुरु ओळखणे कठीण जाते. जो सर्व जिवमात्राला ब्रम्ह समजून वागतो, आपल्या आणि दुसऱ्या जीवात भेद समजून वागत नाही. हा उत्तम गुरु समजावा. हा श्रीमंत तो गरीब तुम्ही अलिकडे या व तुम्ही पलिकडे जा, असा भेदभाव समजून वागणाऱ्या जवळ किल्लीच नाही. तो गुरुच नव्हे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
तनमें करो कोई खोजजी, आनंद कंद है ।
गुरुके कृपाबिन ना खुले, ताल बंद है ।।
हा मायारुपी भवसागर तरुन जायचे असेल तर सद्गुरुची आवश्यकता आहे. सद्गुरुच मोक्षपदाला नेतात. एकदा गुरुदेवांनी आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सद्गुरुला शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही तर शिष्याची आध्यात्मिक प्रगती झाली की, ते स्वतःहून त्याला शोधत येतात. सद्गुरुची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम् कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे.
भगवान मेरी नैया उसपार लगा देना ।
अबतक निभाया है, आगे भी निभा देना ।।
संत महात्म्याच्या, गुरुदेवाच्या मतानुसार नाम वाया जात नाही. नामानेच जीवाला आपलं साध्य साधता येते. याच नामाने अजामिळ, गणीकेसारखे महान पापी उद्धरले. वाल्ह्या सारख्या महान पाप्याला ऋषी बनविले. शंकराची विषबाधा नष्ट झाली. गीता, उपनिषदे सुध्दा सांगतात की, गुरुदेवांनी दिलेल्या नामामुळे मनुष्याची जन्ममरणाची येरझार बंद होऊन मनुष्याच्या जन्ममरणाचा नाश होऊन ज्ञान प्राप्ती होते व अंती देवाची प्राप्ती करता येते. अखंड नामस्मरण हे त्या जीवाला जन्ममरणाच्या प्रवाहातून मुक्त करणारा अभ्यास आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
नामस्मरणे, अजि मुक्ती लाभतेही, सर्व काही ।।
वाळलेली गवताची गंजी कितीही मोठी असली तरी अग्नीच्या तडाख्यात जशी साफ होते तसेच नामस्मरणाचे धडाक्यात कितीही असलेले पाप खाक होते. यासंबंधीचा इतिहास असा-- उदाः वाल्ह्या कोळ्याने एक मनुष्य मारावा आणि एक खडा रांजणात टाकावा. याप्रमाणे सात रांजणे भरली. शेवटी त्याला नारदमुनी गुरु म्हणून लाभले. वाल्ह्याला रामराम मंत्राचा जप करायला सांगितले. त्या नामाचे जपाने तो पापमुक्त होऊन महान पुण्यवान झाला. त्या पुण्याचे बळावर तो रामाचा अवतार होण्यापूर्वी रामायणाचे भविष्य लिहू शकला. त्यामुळे महान ऋषी म्हणून प्रसिद्धीस आला. हे आपण सर्वांना माहितच आहे. नामस्मरणाने पापाचा नाश होतो आणि पाप नाहिसे झाले म्हणजे सर्व दुःख नष्ट होते. राष्ट्रसंत म्हणतात.
हरीच्या नामस्मरणाने, हरीचे तेज ये अंगी ।
मनाची दुष्टता नासे, मनही रंगे हरी रंगी ।।
गुरु केल्याशिवाय आपली नाव मुळीच तरणार नाही. श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की, गुरु करण्यापूर्वी शिष्य हा साधनचंतुष्ट संपन्न असावा लागतो, तरच त्याला गुरु करण्यातून उपयोग होतो. तेव्हा शिष्याला पदरात फलश्रृती प्राप्त होण्यासाठी गुरु करुन नाममंत्राचा जप करावा लागेल. प्रथम शिष्याला सत्य काय व असत्य काय हे त्याला कळायला पाहिजे. असत्याचा त्याग करून सत्याचा स्विकार करावा लागतो. दरिद्र आणि अविवाहित तरुणाकडे स्वर्गीची उर्वशी आश्रय मागण्यास आली असताना हे तुच्छ वाटायला पाहिजे. तसेच मन स्वाधीन असावे. इंद्रिये ताब्यात असावी. मनाला सैरभैर भटकू देऊ नये. सद्गुरु वचनावर पूर्ण श्रद्धा असावी. राष्ट्रसंत पुढे म्हणतात की,
पूजा गुरुची होतसे, वचनी त्यांचीया भावना ।
तसेच जगी वागणे, जरी प्राण जाई क्षणा ।।
श्री गुरुदेवाचा नाममंत्र फार उपयोगी आहे. परमात्मा सर्व घटात परिपूर्ण भरला आहे. मात्र त्याला जाणण्याचा मार्ग गुरुकृपेने कळतो. एकूण गुरु जवळून माहिती घेऊन आपल्यात असणारा परमात्मा प्राप्त करावा लागतो.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments