एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन करून एकरा गावाहून परतताना दुचाकीला अपघात झाला. यात एटापल्लीचे माजी उपसरपंच अभय उर्फ पापा वसंतराव पुण्यमूर्तीवार (५४) यांचा मृत्यू झाला. ही घटना १२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता एकरा गावाजवळ घडली.
एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर एकरा गावात होत आहे. याचेउद्घाटन १२ रोजी करण्यात आले. अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांना निमंत्रण होते. उद्घाटन कार्यक्रम आटोपून ते दुचाकीवरून एटापल्लीला परतत होते.
अपघातानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविले, पण पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात.
वडिलांनंतर मुलाचाही महिनाभरात मृत्यू •
अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे महिनाभरापूर्वीच वृध्दापकाळाने निधन झाले होते. पाठोपाठ मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुसरा आघात झाला. त्यांच्यावर १३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी कन्या त्रतू हिने अग्निडाग दिला.