शेतकरी भयभीत : शेतकऱ्यांपुढे वाघाचे संकट
बल्लारपूर (ता.प्र.). रब्बी हंगाम सुरू असून, आता अनेक पिके मळणीस तयार झाली आहेत. हाता-तोंडांशी आलेला घास हिंस्र प्राण्यांमुळे हिरावणार म्हणून पळसगाव येथील पंढरी उपरे हे शेतकरी तूर पिकासाठी नियमितप्रमाणे जागली करायला गेले. पण, मचानीपर्यंत जाताच अचानक वाघाने डरकाळी फोडली. आपला बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने मचानीचाच आधार घेतला.
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील संपूर्ण शेतकरी हे रोज हरभरा, तूर, मूग, ज्वारी, गहू आदी पिकांचे रक्षण करण्याकरिता जागल करतात. जेणेकरून शेतातील पीक सुखरूप घरी यावे, रानटी डुकरांमुळे पीक उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी जागली केली जाते. पंढरी उपरे यांचे शेत पळसगाव येथील शेतशिवारात असून, त्यात तूर पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी रोज शेतात मचानीवरच जागल करतात. परंतु, रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पंढरी उपरे शेतात जागलीसाठी गेले असता त्यांना वाघाच्याडरकाळीचा आवाज आला. त्यांनी अचानक वाघाचा आवाज ऐकून मचानीवर धाव घेतली. मचानीवर बसल्यावर वाघ हा अगदी 50 फुटावरच समोर येऊन बसला. त्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांना फोन करून बोलावले. वाघ मचानीसमोरून निघून जाईपर्यंत तिथेच बसले. थोड्या वेळातच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. संपूर्ण शेत आरडाओरड करत एकमेकांच्या साहाय्याने पालथे घातले.
बल्हारशाह, कोठारी वन अधिकारी मोक्यावर वाघ
पळसगावातील शेतकऱ्यांच्यामचानीजवळ आल्याची घटना माहिती होताच, बल्लारशाह आणि कोठारी वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी बी.टी. पुरी व एस. ननावरे हे तत्काळ शेतशिवारात पोहोचले. संपूर्ण परिसरात गस्त घालून रात्री 2 वाजतापर्यंत शेतशिवारातच उपस्थित होते. त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा देखील लावण्यात आला आहे. वन विभागाने समस्त शेतकऱ्यांना सतर्कराहण्याच्या सूचना केल्या आहेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये.