PostImage

Konkan News

Aug. 18, 2023   

PostImage

कोकणातील कांदळवन क्षेत्रावर आता उपग्रहाद्वारे राहणार करडी नजर


 

रत्नागिरी : कोकणातील कांदळवन क्षेत्रावर आता उपग्रहाद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने केल्या आहेत. अलीकडेच कोकणातील प्रशासकीय स्तरावर झालेल्या या बैठकीत कोकणातील कांदळवन क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा होणारा हास रोखण्याचा कृषी आराखडा तयार करण्यात आला.

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा, संस्था, अधिकारी यांनी योग्य समन्वय ठेवून तत्परतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी या आराखड्याची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच कांदळवनाच्या बाधित क्षेत्रावर कांदळवनाची पुनर्लागवड करण्यात येणार आहे. या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह एक स्वतंत्र जिल्हास्तरीय व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

तसेच कांदळवन क्षेत्रावर पोलिस यंत्रणा, वनसंरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांच्यामार्फत निगराणी ठेवणे, कांदळवन क्षेत्रात वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी उपाययोजना करणे, या क्षेत्रात सीसीटिव्ही बसविणे आदी उपाययोजना येथे काटेकोरपणे लागू करण्याचे सूचित करण्यात आले आहे. कांदळवन क्षेत्रावर उपग्रहाव्दारे आता २४ तास निगराणी ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणावर लगाम घालण्याचे काम आता करण्यात येणार आहे.