गोंदिया, ब्युरो. शिवीगाळ करीत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला तू शिवीगाळ कशाला करतोस, असे हटकले असता उपसरपंचाला शिवीगाळ करून पेचकसने भोसकले. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी (दि. 12) घडली.
उपसरपंच नेपाल देवनाथ शेंडे (45, रा. कोरंभी) यांचे गावात मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दुकान बंद करून ते गावातीलच आंबेडकर चौकात बसून होते. यावेळी अशोक गुलाब मेश्राम (50) हा रस्त्याने शिवीगाळ करीत जात होता. दरम्यान नेपाल यांनी त्याला विनाकारण शिवीगाळ कशाला करतोस,
असे म्हणत हटकले. दरम्यान अशोकने अश्लील शब्दात शिवीगाळ करून नेपालच्या पाठीवर पेचकसने वार केला. त्यानंतर विलास केवळराम मेश्राम (35) हादेखील तेथे आला. त्यानेही शिवीगाळ करून ढकलून मारहाण केली. यात नेपाल शेंडे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्राप्त तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
बल्लारपूर, (ता.प्र.) वाघाच्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 वाजताच्या सुमारास बल्हारशाह वनपरिक्षेत्रात घडली. लालसिंग बरेलाल मडावी (57 रा. मणिकपूर माल (बेहराटोला) त. बिछाया जि. मंडला रा. मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर व वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह आपल्या अधिनस्त वनकर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाघ हा मृतदेहाजवळच बसून होता. वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता वाघाने वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने धूम ठोकली. दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास अति शिघ्र दलाला पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डॉट मारुन सदर वाघाला बेशुध्द केले.
त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला. तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईकास सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील गाडे, क्षेत्र सहाययक के.एन. घुगलोत, व्हि.पी. रामटेके, वनरक्षक सुधीर बोकडे, अनिल चौधरी, धर्मेंद्र मेश्राम, तानाजी कामले, वर्षा पिपरे, उषा घोडवे, वैशाली जेनेकर, माया पवार, पुजा टोंगे आजी कर्मचाऱ्यांनी केली.
गडचिरोली, ब्युरो. घरी एकटीच असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रेगडी पोलिस मदत केंद्रात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्नजीत उर्फ नाटो भवरंजन दत्त रा. विकासपल्ली ता. चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे वडील नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात कामाला गेले होते. पीडित मुलीची आई घरी होती. दरम्यान, प्रसन्नजित याने पीडितेचे घर गाठले. पीडितेच्या आई वडिलांची कोणतीही परवानगी न घेता
तसेच पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानासुद्धा जाणूनबुजून त्याने तिला फुस लावून पळून नेले. यासंदर्भात पीडितेच्या आईने रेगडी पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक राहुल बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधुरी शेलार करीत आहेत.
चंद्रपूर : वेकोलिच्या एकतानगर चारगाव वसाहतीमधील एका विवाहित महिलेने स्वतःच्याच गळफास घरी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रुबी पवन राय (३२) मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाचे वडील आणि भावाने केला आहे.
पवन राय हे वेकोलित नोकरीला आहेत. रुबी यांच्यासोबत त्यांचा १२ वर्षापूर्वी विवाह झाला. त्यांना दोन मुली आहेत. वेकोलिच्या एकतानगर वसाहतीत पत्नी, दोन मुली व आईसह राहतात. सोमवारी पती व सासू बाहेर गेली असता, पत्नी रुबी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोरची : तालुका मुख्यालयापासून सहाकिलोमीटर अंतरावर येत असलेल्या सोहले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्य प्रवेशद्वार व सिमेंटचे पिलर कोसळून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. १३ रोजी ही घटना घडली.
पूर्वशी मदन उंदिरवाडे (वय ६, रा. सोहले) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास शाळेच्या वेळेत पूर्वशी शाळेच्या मुख्य द्वाराजवळ खेळत होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर शाळेचा लोखंडी प्रवेशद्वार व पिलर कोसळले.
यात तिचा डावा पाय तुटला व डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव झाला. त्यानंतर कोरची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार देऊन दुखापत गंभीर असल्यामुळे तिला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
रुग्णवाहिकेला विलंब, विद्यार्थिनी ताटकळत
१०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे बराच वेळपर्यंत विद्यार्थिनीला ताटकळत राहावे लागले. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तेव्हा ग्रामीण रुग्णालयातील १०२ रुग्णवाहिका होती; परंतु येथील वाहनचालक रवी बावणे हे उपस्थित नव्हते. तिच्यावर ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर : एकीकडे मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेल्या तरुणांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने २५ हून जास्त महिलांना गंडा घातला आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे फिरोज निजाम शेख (वय ३२, सध्या रा. कोंढवा, पुणे, मूळ रा. गंगावळण, कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पुण्यातून अटक केली. त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
घटस्फोटित विधवा महिलांना लक्ष्य
शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाइल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणाने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले.
त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिने उकळले.
लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १० जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
● कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.
२५ महिलांना लुबाडले
शेख याने २५ महिलांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, काही ठिकाणी तक्रार अर्ज आहेत.
गडचिरोली : सध्या मकरसंक्रांतीच्यापर्वावर पतंगबाजीला चांगलेच उधाण आले आहे. शहरातील रस्त्यांवर लहान मुलांसह तरुणही पतंग उडवताना दिसत आहेत. दरम्यान शाळेतून घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार नायलॉन मांजाने जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी ४.३० वाजता शहरातील धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरात घडली. शैलेश आकरे (३५) असे जखमीचे नाव असून ते स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
नुकताच गडचिरोली शहर पोलिसांनी २० हजार रुपये किंमतीचाबंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी दुपारी ४.३० वाजता शाळा सुटल्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे उपप्राचार्य शैलेश आकरे हे दुचाकीने घराकडे जात होते.
दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी नुकतीच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. नगर पालिकेनेही या संदर्भात जनजागृती केली होती. मात्र, यानंतरचही नायलॉन मांजाचीही विक्री झाल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
वाघाने वनमजूरावर हल्ला करून केले ठार व मांडला मृतदेहाजवळ ठिय्या
बल्लारपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाजवळ ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले.
१४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कंत्राटदार यांना वाटप करण्यात आलेल्या बांबू युनिट क्रमांक ५ राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये कामगार ५७ वर्षीय लालसिंग बरेलाल मडावी रा. जिल्हा मंडला राज्य मध्यप्रदेश हा बांबू निष्कासनाचे काम करीत होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंग वर हल्ला करीत त्याला ठार केले.
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ उलट वन कर्मचाऱ्यांवर धावण्याचा प्रयत्न करीत होता. वाघ मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता, बराच वेळ निघून गेल्याने वनविभागाने अतिशीघ्र दलाला पाचारण केले.
अतिशीघ्र दलाचे शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले, पशुवैधकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी वाघाची तपासणी करीत त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सदर वाघ हा नर असून तो ४ वर्षाचा आहे, वाघाला पुढील तपासणी साठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले असून मृत लालसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता रुग्णालयात नेण्यात आला आहे सदर मृतकाचे नातलगांना वनविभागाने तत्परतेने कारवाई करुन आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत
विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा
गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत. श्री. धर्मपाल मेश्राम यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० पर्यंत अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेसोबत आढावा व चर्चा. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या योजनांचा आढावा. दुपारी १.०० ते २.०० गोंडवाणा विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिव व प्रबंधकांसोबत शैक्षणिक विषयांवरील चर्चा. दुपारी २.०० ते ३.०० राखीव. दुपारी ३.०० ते ४.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत विविध योजनांबाबत चर्चा. दुपारी ४.३० ते ५.०० अनुसूचित जाती-जमातीच्या संघटनांसोबत चर्चा व निवेदने स्वीकारणे. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
१७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता गोंदियाकडे प्रयाण.
000
नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वर्गमैत्रिणीसह प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीयूषा वेळकर (२६, नवीन कामठी) असे मृत युवतीचे नाव आहे. तर सागर राजू करडे (३०, कन्हान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूषा ही नवीन कामठीत आईवडील आणि भावासह राहते. तिचे वडील व्यवसाय करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख वर्गमित्र सागर करडे याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असताना सागरने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकर दिला. दोघांनीही कुटुंबियांची परवानगी घेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत विचारणा करण्याचे ठरविले. दोघांचेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न केल्यानंतर जगायचे कसे? असा प्रश्न करीत नोकरी लागल्यावर कुटुंबियांशी चर्चा करुन लग्न ठरवू, असे सांगून पीयूषाची समजूत घातली. पीयूषा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली तर सागर मुंबईला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागला.
लग्नाचा तगादा आणि प्रियकराची टाळाटाळ
पीयूषा आणि सागर दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आता लग्नाला कुणी विरोध करणार नाही, अशी धारणा ठेवून सागरकडे लग्नाचा तगदा लावत होती. मात्र, सागर वेगवेगळी कारणे देऊन लग्नास टाळाटाळ करीत होता. प्रियकराची लग्नास टाळाटाळ बघता पीयूषा नैराश्यात गेली. तिने नोकरी सोडून दिली आणि घरी राहायला लागली. यादरम्यान, तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले.
प्रियकराचा नकार अन् प्रेयसीची आत्महत्या
१० डिसेंबरला पीयूषाने सागरला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी सागरने तिला थेट लग्न करण्यास नकार देऊन चांगला मुलगा बघून लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबियांनी लग्न करण्यास नकार दिल्याचा बहाणा सागरने करीत पुन्हा लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीयूषा आणखी नैराश्यात गेली. ती अबोल झाली. तिने वडिलांकडे सागरबाबत सांगून त्याच्या आईवडिलांना लग्नाबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सागरने लग्न करण्यास नकार देऊन संबंध संपल्याचे सांगितले. त्यामुळे पीयूषाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. सागरने प्रेमात दगा दिल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे तिने आईकडे बोलून दाखवले होते. आईने तिला धीर देऊन सांत्वन केले होते. मात्र, पीयूषाने २९ डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी सागरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला
नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय तरुणाचा गळा कापला
भंडारा:-नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. मात्र, हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. लाखनी येथील उड्डाणपुलावर भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला. ही धक्कादायक घटना १३ जानेवारीरोजी सायंकाळच्या सुमारास घडली. शुभम जियालाल चौधरी रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे जखमी तरुणाचे नाव आहे.
शुभम हा मकरसंक्राती निमित्ताने दुचाकीने भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात होता. दरम्यान, लाखनी शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापला गेला. यात शुभम गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला भंडाराच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते. यात नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बंदी असतानाही मांजाची विक्री होत आहे. यात पशुपक्षी तर जखमी होत आहेत. मात्र, आता याचा सर्वाधिक दुष्परिणाम मानवावरही दिसून येत आहे. याच नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय शुभमचा गळा कापला गेला. सुदैवाने तो बचावला.
नायलॉन मांजा बंदीबाबत प्रशासनाने गंभीर पावले उचलावीत, त्याचबरोबर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली.
हर्ष साखरे विदर्भ फायर न्यूज संपादक 9518913059
आज दिनांक 14 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रामदास मसराम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:
ग्रामीण भागातील नागरिकांना जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट सोलर तार फेंसिंग देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या रेतीपुरवठ्यावर चालू असलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण करता येईल.
जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील प्रशासनाने सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
आमदार रामदास मसराम यांनी या चर्चेतून जिल्ह्यातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.
गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध विभागांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा मॅराथॉन बैठकीतून घेतला. त्यांनी विभाग प्रमुखांना दायित्व रक्कमेची अगोदर मागणी करून नंतर नवीन कामांची नोंदणी आयपास प्रणालीवर प्राधाण्याने करण्याचे आणि प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नियोजन विभागानेही प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा निधी प्राप्त निधीच्या प्रमाणात संबंधीत विभागांना तातडीने बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याचे सांगितले.
येत्या काळात जिल्ह्यातील खाणकाम रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने कौशल्य विकास विभागाने खाणकामाशी संबंधित प्रशिक्षण सुरू करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष नियोजन करावे, जिल्हा ग्रंथालयाने सुसज्ज आणि आधुनिक ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले. विकासनिधी मंजूर असलेल्या सर्व कार्यालयांनी निधी खर्चासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. यासंदर्भात निधी उपलब्धता, प्रशसकीय मान्यता अथवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास संबंधीत विभागाने आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याच्या सूचनाही त्यांनी यसाप्रसंगी दिल्या.
बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000
देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा येथील शेतकऱ्यास ऐन मकरसंक्रांती सणाच्या दिवशी म्हणजेच आज, मंगळवारी १४ जानेवारीला सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान वाघाने हल्ला चढविल्याची घटना जुनी वडसा येथील शेतशिवारात घडली. गणपत केशव नखाते वय ४६ वर्षे, रा. जुनी वडसा, ता. देसाईगंज असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेतकरी गणपत नखाते हे आज सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर गेले होते. अशातच शेतावर कामे करीत असतांना गणपत यांचेवर अचानकपणे भल्या मोठ्या वाघाने मागेहून हल्ला चढवला. हल्ला चढवताच त्यांनी आरडा ओरड केली. आरडा ओरड करताच परिसरातील शेतकरी तसेच मकरसंक्रांती सणा निमित्त नदी तीरावर जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धावघेतली
घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याने वाघाने जुनी वडसा शेतशिवारातून कुरुड गाव परिसराकडे धूम ठोकली. घटनास्थळावर काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. जखमी शेतकऱ्यास नागरिकांनी तात्काळ देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वाघाने मागेहून हल्ला चढवत गणपत नखाते यांच्या पाठी मागील खालील भागावर पंजा मारून जखमी केले आहे. सदर घटनेची माहिती देसाईगंज वन विभागास देण्यात आली. त्यानुसार वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी धोंडणे, वनक्षेत्र सहाय्यक के. वाय. कऱ्हाडे सह वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचेकडून वाघावर पाळत ठेवण्यात येत आहे.
ऐन मकरसंक्राती सणाच्या दिवशीच वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाघाचा बंदोबस्त करून जखमी शेतकऱ्यास वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी केली जात
फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
अहेरी:-
'फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी वय २२ रा. मालेगाव जि. नाशिक असे आरोपीचे नाव आहे. अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला.
दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४० (१),६५ (१) भारतीय न्याय संहिता, सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे. आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला १३ जानेवारी रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही 'ऑनलाईन'चा विळखा
एरवी समाज माध्यमावर झालेल्या ओळखीतून अत्याचार झाल्याचा घटना शहरी भागात दिसून येतात. मात्र, याचे लोन गडचिरोलीतील ग्रामीण भागातही पसरल्याचे चित्र आहे. अहेरीतील घटनेने पालकांना धक्का बसला आहे. यापूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मधल्या काळात वृद्धांचीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. परंतु आता यामाध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येत आहेत
यातील केवळ काहीच प्रकरणाचा उलगडा होतो तर अनेक प्रकरणात सामाजिक प्रतिष्ठेमुळे पालक तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन पाल्यांना मोबाईल देत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून केल्या गेले आहे.
कुरखेडा : दुर्गम गावातून उच्च शिक्षण घेण्यासह पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली गाठले. दोघेही वेगवेगळ्या गावचे; पण ध्येय एकच होते. जवळपास भाड्याच्या खोलीत राहत असल्याने ओळख झाली. सततच्या संपर्कामुळे आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. एकमेकांशिवाय जगणे अशक्य वाटू लागले. अंगावर खाकी वर्दी चढवू पाहणारे हे प्रेमीयुगुल अखेर ११ जानेवारी रोजी गेवर्धा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने बोहोल्यावर चढून विवाहबद्ध झाले.
अनिल सुधाकर पोर्तेट (24) एम.पो. जिमलगट्टा ता.अहेरी व अनिता सुक्रम कोरामी (२६) मु, कसुरवाहीपो. जारावंडी ता. एटापल्ली अशी विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. अनिल व अनिता हे गडचिरोली येथे उच्च शिक्षण घेण्यासह पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली येथे आले होते. गडचिरोली शहरातील एका वॉर्डात ते परिसरातच राहून अभ्यास करीत असत. सोबतच पोलिस भरतीची तयारी करीत होते. यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत, त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम एवढे दृढ झाले की, त्यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरविले; परंतु आपल्या प्रेमाला कुटुंबीयांकडून विरोध होऊ शकतो, अशी शंका त्यांच्या मनात होती. अखेर गेवर्धा येथे तंमुसच्या पुढाकाराने विवाह सोहळा पार पाडण्यात आला. याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, तंटामुक्त गाव समिती
मित्र बनला दुवा
गडचिरोलीतसुद्धा कोणीच ओळखीचे नव्हते. तेव्हा त्यांच्या परिसरातच राहून शिक्षण घेणारे गेवर्धा येथील मित्र लोमेश्वर कुळमेथे यांच्यासमोर त्यांनी प्रेमविवाहाची इच्छा बोलून दाखविली. कुळमेथे यांनीही यातून मार्ग शोधत गेवर्धा येथे तंमुसच्या पुढाकारातून प्रेमविवाह करण्याचा सल्ला दिला व त्यांना गेवर्धा येथे विवाह झाला.
अध्यक्ष राजू बारई, पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, आशिष टेंभुर्णे, राजेंद्र कुमरे, सुरेश पुसाम, सुधीर बाळबुद्धे, मडावी, योगेश नखाते, प्रभाकर कुळमेथे, संदीप कुमरे, माधुरी शेंडे, हीना पठाण, मनीषा कुळमेथे, डाकराम कुमरे, कृष्णा मस्के, दिनेश कावळे, पीयूष कुळमेथे, राहुल नखाते, विनोद गावळे व नागरिक उपस्थित होते.
एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन करून एकरा गावाहून परतताना दुचाकीला अपघात झाला. यात एटापल्लीचे माजी उपसरपंच अभय उर्फ पापा वसंतराव पुण्यमूर्तीवार (५४) यांचा मृत्यू झाला. ही घटना १२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता एकरा गावाजवळ घडली.
एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर एकरा गावात होत आहे. याचेउद्घाटन १२ रोजी करण्यात आले. अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांना निमंत्रण होते. उद्घाटन कार्यक्रम आटोपून ते दुचाकीवरून एटापल्लीला परतत होते.
अपघातानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविले, पण पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात.
वडिलांनंतर मुलाचाही महिनाभरात मृत्यू •
अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे महिनाभरापूर्वीच वृध्दापकाळाने निधन झाले होते. पाठोपाठ मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुसरा आघात झाला. त्यांच्यावर १३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी कन्या त्रतू हिने अग्निडाग दिला.
दुचाकीची कट मारुन, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने केला हल्ला, दोन्ही तरुण गंभीर
चंद्रपूर :
दुचाकीची कट लागल्याच्या वादातून ३ जानेवारी रोजी तन्मय जावेद शेख याची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याची शाई वाळत नाही तेच काल १२ जानेवारी ला कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना चंद्रपुरात घडली.
जटपुरा गेटकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकी चालकाने कट मारले. यावरून वाद झाल्यानंतर कट मारणाऱ्यानी दोन जणांवर धारदार शस्त्राने वार करून दोघांना जखमी केले. ही घटना गिरनार चौकात १२ जानेवारी ला रात्री १०.३० वाजता घडली. शहर पोलिसांनी हल्लेखोर आकाश येलेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर साहिल चंद शेख (३३) रा. इंदिरा नगर पंचशील चौक चंद्रपूर हा त्याचा मित्र राहुल गजानन वानखेडे (३०) रा. बालाजी वॉर्ड याच्यासोबत त्यांच्या दुचाकीने गांधी चौकाकडे जात असताना आकाश सुधाकर येलेवार, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर हे गांधी चौकाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीने कट मारले. साहिलने त्याला अडवल्यावर त्याने शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात वाद झाला असता आकाशने साहिलच्या पोटावर व डाव्या खांद्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. राहुल त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता त्याच्या पोटावरही वार करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले. तेथे जमलेल्या जमावाने हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. जखमीचा तक्रारी वरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे शहर पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध कलम ११८ (१), २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गुरनुले तपास करत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी
आष्टी (अशोक खंडारे):-
वाचन संकल्प महाराष्ट्र या संकल्प ने वर आधारित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आष्टी येते, वाचन संस्कृती पंधरवडा महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने “ग्रंथप्रदर्शनी “आयोजित करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रंथालयात उपलब्ध संदर्भ ग्रंथ,चरित्र,स्पर्धापरीक्षा,विश्वकोष, मासिके इत्यादी वाचन साहित्याचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. आणि त्यातून विविध विषयांवरील ग्रंथा विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. संजय फुलझेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याच्या मनात वाचनाविषयी उत्सुकता ,वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थिती डॉ. राज मूसने,डॉ. रवि शास्त्रकार ,प्रा.नाशिका गभने .कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योती बोबाटे तर आभार प्रदर्शन प्रा.रवि गजभिये यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राजकुमार लखमापुरे,श्री. निलेश नाकाडे,श्री. आय.आर.शेख, श्री.एम.डी. मुश्ताक, संजित बच्चाड,श्री.प्रभाकर भोयर, दिपक खोब्रागडे,संतोष बारापात्रे, महा.विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर, ब्युरो. नागभीड वनपरिक्षेत्रातील रण (परसोडी) परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना पारडी (थावरे) गावातील कोसंबी बीट येथील मिंडाळा सर्कलमध्ये शुक्रवारी (दि.10) दुपारच्या सुमारास घडली. गुरुदेव पुरुषोत्तम सराय (42) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास गुरूदेव सराय हे शेतात काम करीत असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील
खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.