गडचिरोली, ब्युरो. विधानसभेच्या निवडणुकीत यंदा आरमोरी व अहेरीत दोन माजी आमदारांना मतदारांनी झिडकारले. प्रचारादरम्यान जेवढे चर्चित राहिले, त्या तुलनेत त्यांना मतदान पडले नाही. त्यामुळे दोन्ही माजी आमदारांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राज्यात चर्चित राहिलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी माजी आ. दीपक आत्राम यांना मोठी चपराक बसली. त्यांना केवळ 6 हजार 606 मते पडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दीपक आत्राम यांना 43 हजार 22 मते मिळाली होती. त्यावेळी ते काँग्रेसचे उमेदवार होते. 2014 मध्ये 33 हजार 555 तर 2009 च्या निवडणुकीत ते निवडून आले होते. मात्र त्यानंतर त्यांचा मतांचा ग्राफ घसरला. यंदा तर दीपक आत्राम यांचे डिपॉझिट जप्त झाले. गेल्या काही वर्षापासून त्यांचे आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्याकडे दुर्लक्ष तसेच जनसंपर्काअभावी त्यांना विधनसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांपैकी 22 उमेदवारांना कमी मतदान झाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे, त्यात दोन माजी आमदारांचाही समावेश आहे. 29 पैकी केवळ 7 उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले. आरमोरी मतदारसंघात 8 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी कृष्णा गजबे आणि रामदास मसराम वगळता कोणत्याहीउमेदवाराला अनामत रक्कम वाचविता येईल एवढी मते मिळाली नाहीत. त्यात दोन वेळा आमदार राहिलेले आनंदराव गेडाम यांचाही समावेश आहे. अहेरी मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी धर्मरावबाबा आत्राम, अंब्रिशराव आत्राम आणि भाग्यश्री आत्राम वगळता इतर सर्व 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात माजी आ. दीपक आत्राम यांचाही समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात यंदा अपक्षांचा बोलबाला दिसून आला. मात्र अहेरी वगळता त्यांचा करिश्मा चालला नाही. अहेरीत राजे अंब्रिशराव दुसऱ्या क्रमांकावर तर अपक्ष हनुमंतू मडावी यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही धर्मरावबाबा आत्राम मोठ्या फरकाने निवडून आले. गडचिरोली मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी डॉ. मिलिंद नरोटे आणि मनोहर पोरेटी वगळता कुणालाही अनामत रक्कम वाचविणे शक्य झाले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर डॉ. सोनल कोवे, डॉ. शिलू चिमूकर, क्रांती केरामी व आनंदराव गेडाम चर्चित आले होते. त्यांच्या उमेदवारीने काँग्रेसला मोठा फटका बसेल असा अंदाज वर्तविला जात होता. उलट आरमोरीत काँग्रेसचे रामरास मसराम विजयी झाले. गडचिरोलीतही अपक्ष तथा लहान पक्षांचा करिश्मा चालला नाही.
गडचिरोली : “निवडणूक संपली आता जावई आणि लेकीने सासरी निघून जावे, त्यांचे इथे कोणतेही काम नाही.” विधानसभा निवडणुकीत विरोधात उभ्या राहणाऱ्या भाग्यश्री हलगेकर यांना धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेला वडीलकीचा सल्ला जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मुलगी भाग्यश्री हलगेकरने बंड करून आव्हान दिल्याने अहेरी विधानसभेत वादळ उठले होते. शरद पवार गटाने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी, दुसरीकडे बंडखोर उमेदवार पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम, अशी तिरंगी लढत झाली.
प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढण्यात आली. टोकाचा राजकीय संघर्ष दिसून आला. समाजमाध्यमावर काही वादग्रस्त ‘ऑडिओ क्लिप’ सार्वत्रिक झाल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे अहेरीकडे लक्ष लागले होते. बंडखोरामुळे मतदानात झालेले विभाजन पाथ्यावर पडल्याने अनेकांचे अंदाज चुकवून अखेर धर्मरावबाबा आत्राम १६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. आत्राम यांचा पुतण्या अम्ब्रीश आत्राम आणि मुलगी भाग्यश्री यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या विजयाने धर्मरावबाबा आत्राम यांनी आपले राजकीय वजन पुन्हा एकदा दाखवून दिले. विजयानंतर ते मुलगी आणि जावई पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आत्रामांनी जावई आणि मुलीला सासरी जाण्याचा सल्ला देत सर्व शक्यतांवर एकप्रकारे विराम लावला आहे.
“बाप तो बाप होता है”
यंदा पहिल्यांदाच आत्राम राजघराण्यातील तिघांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. यापैकी पुतण्या भाजप बंडखोर म्हणून अम्ब्रीशराव आत्राम हे आमदार राहिले आहेत, तर भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी यापूर्वी गडचिरोली विधासभेतून निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. निकालानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत धर्मरावबाबांनी “बाप तो बाप होता है” हे सांगून विरोधकांचे तोंड बंद केले, अशी चर्चा अहेरी मतदारसंघात आहे. दुसरीकडे, भाजप नेतृत्वाने बंडखोरी केलेल्या अम्ब्रीश आत्राम यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खदखद आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर तरी कारवाई करणार का, असा प्रश्न अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात येत आहे
गडचिरोली : 24 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र अहेरीत राजे अंबरीशराव आत्राम, हनुमंतू मडावी यांनी जोरदार लढत दिली. आत्राम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर मडावी यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 असे एकूण 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी तब्बल 24 उमेदवारांवर जमानत जप्त होण्याचा प्रसंग ओढविला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आनंदराव गंगाराम गेडाम अपक्ष (1954), डॉ. शिलू चिमूरकर पेंदाम अपक्ष (854), मोहनदास गणपत पुराम वंचित बहुजन आघाडी (1808), चेतन नेवशा काटेंगे- आझाद समाज पार्टी (कांशीराम) (1927), अनिल तुलाराम केरामी-बसपा (3438), खेमराज वातूजी नेवारे अपक्ष
(745), संजय सुभाष कुमरे बसपा (3241), जयश्री विजय वेळदा पीजेंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (3362), भरत मंगरुजी येरमे वंचित (1852), योगेश बाजीराव कुमरे गोंगपा (480), दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (673), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे अपक्ष (768), डॉ. सोनल चेतन कोवे अपक्ष (1552), रमेश वेल्ला गावडे बहुजन समाज पार्टी (2674) संदीप मारोती कोरेत मनसे (2993), नीता पेंटाजी तलांडी प्रहार जनशक्ती पार्टी (1214),
आत्राम दीपक मल्लाजी अपक्ष (6606), कुमरम महेश जयराम अपक्ष (1112), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (1339), नितीन कविश्वर पदा- अपक्ष (5648), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (3902) आदी उमेदवारांचे डीपॉझीट जप्त झाले. यातील आनंदराव गेडाम, डॉ. शिलू चिमूरकर व डॉ. सोनल कोवे प्रचारादरम्यान चर्चित राहिल्या. मात्र त्या तुलनेत त्यांना मते मिळाली नसल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तिन्ही विधानसभा क्षेत्रातील 13 अपक्षांचे दुर्दैव
गडचिरोली, ब्युरो. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करून महासंग्रामात उतरलेल्या 13 अपक्ष उमेदवारांना यावेळी चांगलाच धोबीपछाड मिळाला आहे. तिन्ही विधानसभा क्षेत्रातील एकूण 13 अपक्षांना फारसे मतदान मिळाले नाही आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. याला फक्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार अपवाद ठरले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व अहेरी या 3 मतदारसंघात एकूण 29 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारही मैदानात होते. आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आनंदराव गेडाम, डॉ. शीलू चिमूरकर यांनी अपक्षपणे ही निवडणूक लढविली. याशिवाय खेमराज नेवारे हेदेखील अपक्षरित्या मैदानात होते. यातील कुणालाच प्रभावी
कामगिरी करता आली नाही. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात दिवाकर पेंदाम, बाळकृष्ण सावसाकडे, डॉ. सोनल कोवे यांनी अपक्षपणे नशीब आजमाविले. मात्र त्यांनाही प्रभावी मतदान घेता आले नाही. अहेरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दीपक मल्लाजी आत्राम, कुमराम जयराम, शैलेश गेडाम, नितीन पदा, राजे अंबरीशराव सत्यवानराव आत्राम, भाग्यश्री लेखामी, हनुमंतू मडावी हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. यातील दीपक आत्राम, अंबरीशराव आत्राम, हनुमंतू मडावी हेच काही प्रमाणात मतदारांना आकर्षित करू शकले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा अपक्षांना स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली दि. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी विधानसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे डॉ. मिलींद रामजी नरोटे आणि 69-अहेरी विधानसभा मतदार संघातून नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले आहेत. त्यांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, श्री. राहूल मीना व श्री कुशल जैन यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी मतदारसंघातून 8, 68-गडचिरोलीतून 9 आणि 69-अहेरीतून 12 असे एकूण 29 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार उमेदवारांना मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे आहेत.
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ: रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस ( 98509 ), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी ( 92299 ), आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष(1954 ), डॉ. शिलू चिमुरकर पेंदाम - अपक्ष( 854 ), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी(1808 ), चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम) (1927 ), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी(3438 ),खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष( 745 ), नोटा-1762.
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी( 116540),मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस(101035), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(3241), जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया( 3362 ), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी(1852), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी(480), दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष(673 ), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष( 768 ), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (1552), नोटा-2817.
69- अहेरी विधानसभा मतदार संघ: आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी( 54206 ), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष( 37392 ), आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ( 35765 ), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष(27188 ), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (2674 ) संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना( 2993 ), निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी( 1214 ), आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष(6606 ), कुमरम महेश जयराम- अपक्ष(1112 ), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष(1339 ), नितीन कविश्वर पदा- अपक्ष( 5648 ), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष( 3902 ), नोटा-5825.
000
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवारांची नावे स्पष्ट झाली आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षाने आपापल्या उमेदवारांसाठी विजय मिळवला आहे.
१. अहेरी विधानसभा मतदारसंघ अहेरी मतदारसंघातून
धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय मिळवला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार होते. धर्मरावबाबा आत्राम यांची अहेरी परिसरातील लोकांमध्ये चांगली छाप असून, त्यांनी आपले अनुभव आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर विजय मिळवला आहे. मतदारांनी त्यांच्या विकासाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत त्यांना मोठ्या मतांनी निवडून दिले.
२. आरमोरी विधानसभा मतदारसंघ आरमोरी मतदारसंघातून
रामदास मसराम यांनी विजय मिळवला असून, ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. या विजयामुळे काँग्रेस पक्षाला गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये पाय रोवता आले आहेत. मसराम यांनी मतदारांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यावर भर दिला आणि त्यांच्या प्रचार मोहीमेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
३. गडचिरोली विधानसभा मतदारसंघ गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून डॉ. मिलिंद नरोटे यांनी विजय मिळवला असून, ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. डॉ. नरोटे यांनी भाजपच्या विकासाच्या धोरणांचा प्रचार करत मतदारांचे लक्ष वेधले. त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आरोग्य आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा भर होता.
गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समतोल बदलला : या निकालांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी झाले असून, स्थानिक स्तरावर एकूण राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्थानिक मुद्द्यांवर जोर दिला होता, आणि मतदारांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
नवीन आशा आणि जबाबदाऱ्या निवडून आलेल्या तिन्ही उमेदवारांसमोर त्यांच्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. अहेरी, आरमोरी, आणि गडचिरोली या तिन्ही मतदारसंघांमध्ये रोजगार, आरोग्यसेवा, शिक्षण, आणि आदिवासींशी संबंधित मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. या विजयी उमेदवारांकडून त्यांच्या मतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत.
गडचिरोलीच्या विकासासाठी नवा अध्याय सुरू : गडचिरोली जिल्ह्यात आता नव्या नेतृत्वासह विकासाच्या दिशेने वाटचाल होणार आहे. तिन्ही मतदारसंघातील नवीन नेतृत्व त्यांच्या योजना आणि धोरणांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलवण्यास सक्षम ठरेल, अशी अपेक्षा आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जनता या तीन उमेदवारांना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देत असून, आता त्यांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवले जाईल.
गडचिरोली, दि.22 : 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.
विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड, वडसा येथे, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर 69-अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे. मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ :
67-आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 23 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 88 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
68-गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 26 फेऱ्या, 10 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 80 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
69-अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 22 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 89 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात असून यात 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत.
मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध: मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.
000
गडचिरोली, दि.22 :- 23 जून रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.
विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड, वडसा येथे, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर 69-अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे. मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ :
67-आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 23 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 88 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
68-गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 26 फेऱ्या, 10 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 80 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
69-अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 22 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 89 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात असून यात 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत.
मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध: मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.
गडचिरोली, दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले.
आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरुष मतदार, 1 लाख 31 हजार 710 महिला आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 62 हजार 771 मतदार होते त्यापैकी एक लाख 2 हजार 720 पुरुष, 99 हजार 546 महिला व 1 तृतीयपंथी असे एकूण दोन लाख 2 हजार 267 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 54 हजार 610 पुरुष मतदार , 1 लाख 52 हजार 610 महिला व 3 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 7 हजार 223 मतदार होते. यातील 1 लाख 16 हजार 704 पुरुष मतदार, 1 लाख 13 हजार 469 स्त्री मतदार तर 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 30 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 26 हजार 481 पुरुष मतदार , 1 लाख 24 हजार 974 महिला व 6 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 51 हजार 461 मतदार होते. यातील 95 हजार 511 पुरुष मतदार, 90 हजार 281 महिला मतदार तर 3 तृतीयपंथी असे एकूण 1 लाख 85 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात एकूण 4 लाख 12 हजार 151 पुरुष मतदार, 4 लाख 9 हजार 294 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 8 लाख 21 हजार 455 मतदार होते. त्यापैकी 3 लाख 14 हजार 935 पुरुष, 3 लाख 3 हजार 296 महिला व 5 तृतीयपंथी असे एकूण 6 लाख 18 हजार 236 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात ऐनवेळी निवडणूक कर्तव्य बजावण्यास नकार दिल्याने मतदान अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तहसीलदार प्रिती डुड्डुलकर यांनी १९ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीवरून देसाईगंज ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. मारुती नथ्थुजी बावणकर असे गुन्हा नोंद झालेल्या मतदान अधिकाऱ्याचे नाव आहे. ते येंगलखेडा येथील तुकाराम विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांना याबाबत प्रशिक्षण दिले होते. १८ रोजी त्यांना देसाईगंज येथील वखार महामंडळाच्या गोदामात ईव्हीएम नेण्यासाठी बोलावणे धाडले, परंतु निवडणूक पथकासोबत जाण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागली. मात्र, निवडणूक कार्यास नकार दिल्याने तहसीलदार प्रिती डुडुलकर यांच्या फिर्यादीवरून मारुती बावणकर यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ व भारतीय न्याय संहिताचे कलम २२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप करत आहेत.
गडचिरोली दि .२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.
फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.
भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हे, तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.
प्रशासनाने शाल-श्रीफळ देऊन केले स्वागत
फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे,पुरवठा अधिकारी इंगोले,तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना काळात लसीकरणातही पुढाकार
फुलमती सरकार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान कले.एवढंच काय तर देशावर कोरोना महामारीचा संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे असंही आवाहन केलं होतं.
गडचिरोली,दि.20 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीनही मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम, नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांवरही मतदानासाठी नागरिकांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरारी 69.63 टक्के मतदान झाले होते. यात 67-आरमोरी – 71.26 टक्के , 68-गडचिरोली- 69.22 टक्के व 69-अहेरी- 68.43 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी दुर्गम भागातील पथकांकडील आकडेवारी मिळाल्यावर स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.
आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी लागलेल्या मतदारांच्या मोठमोठ्या रांगेतून दिसून येत होते. शहरी व ग्रामीण भागत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वृद्ध व दिव्यांग मतदारांकरीत व्हीलचेअरची व्यवस्था तसेच सर्वांकरिता पाणी व आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. मदतीसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कर्मचारी नेमण्यात आले होते. अनेक ठीकाणी मतदानाची वेळ संपल्यावरीही नागरिक मतदानासाठी रांगेत उपस्थित होते. अशा ठिकाणी रांगेतील शेवटच्या मतदारापासून सर्वांना टोकन वाटप करून त्यांचे मतदान पूर्ण करण्यात आले.
गडचिरोली. आगामी विधानसभा निवडणुकीत सध्या जिल्ह्यात भलतेच चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 29 उमेदवारांपैकी काही विशिष्ट अशा उमेदवारांकडे संधीसाधूंची मोठी रांग लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत उमेदवारांचा समावेश असून आपला 'पोटोबा' भरण्यासाठी काही जण संबंधिताला 'विठोबा' मानण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते गावकुसाबाहेर फेकल्यागत झाले आहेत. याचे थेट परिणाम या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात गर्भश्रीमंत असलेले काही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. मात्र त्यापलीकडे धनशक्तीच्या ताकदीवर आपापले गठ्ठामतदान एकत्र करण्याचीही किमया साधली जात आहे. यावेळी एकमेकांना एकास एक असे धुरंधर मैदानात टक्कर देत असल्याने या मतदारसंघात सध्या कार्यकर्त्यांची मोठी चंगळ दिसून येत आहे. आपणच तुमचे खंदे समर्थक आहोत, आम्हीच तुमचाजोरकस प्रचार करीत आहोत, असे सांगून आपला 'पोटोबा' भरण्यासाठी अनेकजण सुसज्ज आहेत. गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातही असेच चित्र दिसून येते. जे आजवर घरात बसून होते, ते कार्यकर्ते आता प्रचंड सक्रिय झाले असूनउमेदवारांकडे गर्दी करीत आहेत. आपापल्या भागात तुम्हालाच मताधिक्य मिळवून देऊ, असे आश्वासन देत विशिष्ट पदाधिकारी व ग्रामपातळीवरील कार्यकर्ते उमेदवारांकडून आर्थिक लाभ करून घेत आहेत.
हे उघड चित्र श्रीमंत उमेदवारांकडे सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. असे असताना उमेदवार मात्र मूंग गिळून आश्वासनावर भूक मिटवित आहेत. या सर्व भानगडीत प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्ते दुर्लक्षित पडल्याचे गडचिरोली जिल्ह्यातील चित्र आहे. यंदा सर्वच उमेदवारांनी ही निवडणूक सर करण्यासाठी प्रयत्न चालविले असून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्तेही 'जिधर दम, उधर हम' अशी भूमिका घेत सक्रिय असल्याचे दिसून येते. अहेरीसह गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे.
ओठात एक, पोटात भलतचं..! गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.
उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. मात्र जिल्ह्यातील प्रभावी नेते मंडळी काहीसा बचावात्मक पवित्रा घेत निवडणूक प्रचार करीत आहे. ज्यांना पक्षाकडून तिकिट देण्यात आले नाही, ते प्रचारात दिसत असले तरी त्यांच्या ओठात एक आहे आणि पोटात भलतचं, असल्याचा अनुभव मतदारांना येत आहे. त्यांना डावलण्यात आल्याने आता निवडणूक रिंगणातील आपल्याच स्वपक्षीय उमेदवाराला पाडायचे, यादृष्टीने काहींनी छुपा प्रचारदेखील चालविला असल्याची धक्कादायकमाहिती आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात विधानसभानीवडणुकीसाठी तीन मतदारसंघात २९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांनी नामांकनासोबत जाहीर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार तब्बल आठ उमेदवार कोट्यवधींचे धनी आहेत. यात दक्षिण गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघात सर्वाधिक पाच उमेदवारांचा समावेश असून आरमोरीतील तिघांच्या संपत्तीचे आकडेही कोटीच्या घरात आहेत.
शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल व मागास म्हणविणाऱ्या गडचिरोलीतील प्रमुख उमेदवारांच्या श्रीमंतीची यानिमित्ताने सर्वत्र चर्चा आहे. दक्षिण गडचिरोलीतील अहेरीत आत्राम राजपरिवाराचा गेली अनेक वर्षांपासून दबदबा आहे. अहेरी इस्टेटचाहीपरिसरात वेगळा रुतबा आहे. तीनवेळा राज्यमंत्री राहिलेले धर्मरावबाबा सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत सहा कोटी रुपयांची घट झाल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रात दिसत आहे
त्यांचे पुतणे व अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मालमत्तेत ५० लाखांहून अधिक वाढ झाली आहे. आरमोरीचे माजी आमदार व काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अपक्ष मैदानात उतरलेले माजी आमदारआनंदराव गेडाम यांच्या संपत्तीतही पाच वर्षांत २७ लाखांची वाढ आहे. आरमोरीचे आमदार व महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या संपत्तीत पाच वर्षात ३८ लाख ५० हजारांची भर पडली आहे.
कोणाची किती संपत्ती ?
• धर्मरावबाबा आत्राम (महायुती) ३ कोटी ७१ लाख ५ हजार
• भाग्यश्री आत्राम (मविआ) ६ कोटी ५८ लाख ५ हजार
• अम्ब्रीशराव आत्राम (अपक्ष) ९ कोटी २७ लाख ७२ हजार
• दीपक आत्राम (अपक्ष) १ कोटी १७ लाख ८० हजार
• हनमंतु मडावी (अपक्ष) १ कोटी २ लाख ७५ हजार
आनंदराव गेडाम (अपक्ष) १ कोटी ६४ लाख ७८ हजार
• डॉ. शिलू चिमूरकर (अपक्ष) ४ कोटी ५ लाख
• रामदास मसराम (मविआ) २ कोटी ५० लाख ६० हजार
गडचिरोलीत 'वंचित'च्या येरमेंची संपत्ती नरोटे, पोरेटींपेक्षा अधिक
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे हे ३९ लाख २३ हजार रुपयांच्या संपत्तीचे धनी आहेत. महाविकास आघाडीचे उमेवादार मनोहर पोरेटी यांची संपत्ती ३८ लाख ३० हजार आहे. या दोहोंपेक्षा काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अपक्ष म्हणून मैदानातआलेल्या डॉ. सोनल कोवेंची संपत्ती अधिक आहे. त्यांच्याकडे ४६ लाख २९ हजार रुपयांची संपत्ती आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भरत येरमे हे संपत्तीच्या बाबतीत सर्वांत वजनदार आहेत. त्यांच्याकडे ५० लाखांची मालमत्ता आहे.
गडचिरोली :
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ १३ नोव्हेंबर बुधवार रोजी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा गडचिरोली शहरातून 'रोड शो' होणार आहे. या' रोड शो' मध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वड्डेटीवार, काँग्रेसचे वरीष्ठ
पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी, रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे सहभागी होणार आहेत. प्रियंका गांधी यांना बघण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून पडत आहे. त्यामुळे या 'रोड शो' ला प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरमोरी : विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने कामाला लागा, कुठल्याही स्थितीत विरोधकांच्या भूलथापांना मतदार बळी पडता कामा नयेत, याची दक्षता घ्या, असे आवाहन ज्येष्ठ सहकार नेते व राज्य सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सा. पोरेड्डीवार यांनी केले.
येथे महायुतीचे उमेदवार व आमदार कृष्णा गजबे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ५ नोव्हेंबरला पोरेड्डीवार यांच्या हस्ते फीत कापून झाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी
उपनगराध्यक्ष हैदर पंजवानी, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेटेवार, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिंदेसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप मोटवानी, अमीन लालानी आदींची उपस्थिती होती.
यावेळी अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलाबाबत चुकीची माहिती बिंबवली. मात्र, संविधानाचा भाजप कायम आदर करत आहे. अपप्रचार होऊ नये, यासाठी कार्यकत्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पंकज खरवडे यांनी संचालन केले तर अक्षय हेमके यांनी आभार मानले.
गडचिरोली : भाजप महायुती विरोधात देशपातळीवरील तयार झालेल्या इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राज्यात अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना आता महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचे आदेश दिलेले असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते या आता महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व उमेदवारांना याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जे अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत ते इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचेच पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्ष भाजप महायुती विरोधात प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी दिली आहे.
जयश्री वेळदा - जरातेंवर दाखल आहेत ३ गुन्हे
शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते यांच्यावर वेगवेगळे आंदोलन केल्याबद्दल ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रात दिलेली आहे.जयश्री वेळदा यांचेवर एटापल्ली पोलीस स्टेशन येथे भांदवी ३६५, भांदवी १८८, १४३, २७९ म.पो.का. ३७(१), (३), १३५ असे दोन तर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवी १८८ म.पो.का.१३५ असा एक गुन्हा दाखल असून अहेरी व गडचिरोली न्यायालयात सदर प्रकरणे प्रलंबित आहेत. गडचिरोली विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लोकांसाठी काम करतांना, आंदोलन करतांना गुन्हे दाखल असलेल्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. जल, जंगल, जमीन आणि खदानविरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांपेकी एक असलेल्या जयश्री वेळदा यांनी भाई रामदास जराते यांचेसह २०१७ मध्ये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस न्यायालयीन कोठडीत घालविलेले आहेत हे विशेष!
गडचिरोली दि. 5 (जि.मा.का.) : विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ), रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी), डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी (करवत).
इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)
69- अहेरी विधानसभा मतदार संघ: अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट).
इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).
00000
29 उमेदवारांमध्ये लढत
आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात
गडचिरोली दि. 4 (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 11 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यामुळे आता आरमोरीतून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
67-आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी, वामन वंगनुजी सावसाकडे, निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या ४ उमेदवारांनी, 68-गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम, डॉ. देवराव मादगुजी होळी, मोरेश्वर रामचंद्र किनाके, वर्षा अशोक आत्राम, विश्वजीत मारोतराव कोवासे या 5 उमेदवारांनी आणि 69- अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम व आत्राम अजय मलय्या या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
उमेदवार आहेत रिंगणात :नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:
रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस, कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी, आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष, शिलू प्रविण गंटावार- अपक्ष, मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी, चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष.
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी, संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी, जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी, योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष, बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष, डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष
69- अहेरी विधानसभा मतदार संघ:आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी, संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी, आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष, कुमरम महेश जयराम- अपक्ष, गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष, नितीन कविश्वर पदा- अपक्ष, राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष, लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष, हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष
00000
विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
गडचिरोली, दि. 29 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांची विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निरीक्षक (सामान्य) नेमणूक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी विनीत कुमार, 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र कुमार कटारा, आणि 69-अहेरी(अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी अनिल कुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त विनीत कुमार यांचा संपर्क क्रमांक 9404306018 व 07137-272021 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह आरमोरी येथे सकळी 11 ते दुपारी 1 पर्यंत उपलब्ध राहतील.
68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त राजेंद्र कुमार कटारा यांचा संपर्क क्रमांक 9404306011 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विश्रामगृहात सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत उपलब्ध राहतील.
69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त अनिल कुमार ठाकूर यांचा संपर्क क्रमांक 9404306029 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत उपलब्ध राहतील.
निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांनी निवडणूक निरीक्षक यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा विश्रामगृह येथे दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000