PostImage

pramod abhiman raut

Aug. 12, 2023   

PostImage

पावसाच्या सरींसोबत सुगरणीच्या खोप्याची निर्मिती


 

चिमूर :-

       जगातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित घर बांधण्यामध्ये सुगरण पक्षाएवढे हुशार कोणी क्वचितच असेल. सुगरण पक्षी बाभळीच्या झाडावर आणि विहिरीजवळील भागात आपले घर किंवा खोपा बांधणे सुरू करत असते. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसानंतर आता या पक्षाचा खोपा बांधणे सुरू असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.

       अतिशय सुरक्षित आणि सर्वापासून वेगळे घरटे बांधणारा सुगरण पक्षी सध्या विहिरीजवळ असणाऱ्या बाभळीच्या फांद्यावर आपली घरटी निर्माण करताना पाहून आपणही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. या पक्षाची वास्तु विशारदाची कला पाहता मनःपूर्वक कौतुक करावेसे वाटते. धान्य, किड्या मुंग्या खात असल्याने त्यांची उपलब्धता असलेल्या शेतातीलच बाभळीच्या झाडावर, काटेरी झुडपावर तो घरटी बांधत असतो. यासाठी तो अशी जागा निवडतो की तिथे साप, शिकारी इतर पक्षी पोहोचणार नाहीत, अशा ठिकाणी वसाहत करून कल्पकतेने राहणारा पक्षी असल्याने एकाच झाडावर त्यांची वीस-पंचवीस घरटी लोकाळताला दिसत असतात. हा प्रतिभावंत विणकर आपले घरटे काथ्याच्या गवताच्या धाग्यापासून विणतो. याचा आकार पुंगीसारखा असतो. मध्ये फुगीर खाली नळीसारखा बोगदा असतो. ते घरट्याचे प्रवेशद्वार, मधल्या फुगीर भागात वाटीच्या आकाराची शय्या असते. त्यात मऊपिसे, कापूस असतो, असे आकर्षक घरटे बांधत असताना सुगरण पक्षी पंख फडफडवीत आवाज काढत मादी पक्षाला साथ देतो. घरटे पाहायला बोलावतो, मादी सुगरण येते, हे घरटे न्याहाळते आणि घरटे पसंत पडल्यास ती त्या नराला वरते. त्यांच्या विणीचा हंगाम जून ते सप्टेंबरपर्यंत चालतो. मादी सुगरण घरट्यात दोन ते चार पांढरी शुभ्र अंडी घालते व पिल्ले जन्म घेतात. पुन्हा दुसरे घरटे बांधून दुसऱ्या मादीला दाखवतो, अशाप्रकारे सुगरण नर अनेक घरटी बांधतो. त्याचे घरटे कसल्याही वादळीवाऱ्यात व पावसातही तग धरून राहते. तसेच हवेच्या झोताबरोबर हेलकावतानाचा निसर्गरम्य नजराणा पाहिल्यास जगातील दहावे आश्चर्यच म्हटले पाहिजे. ना कोणती पदवी, ना कोणते शिक्षण पण वास्तूविशारदापेक्षाही मजबूत असे घरटे बांधण्यास हे पक्षी सक्षम असतात. म्हणूनच त्याचे नाव सुगरण ठेवले असावे, असे वाटते.