मद्य धोरण प्रकरण : ईडीने सर्वोच्च न्यायालयात जामिनाला केला नाही विरोध
नवी दिल्ली: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील नेते खा. संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे संजय सिंह यांच्या जामिनाला कोणताही विरोध नसल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. संजय सिंह यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जामीन मिळाल्याने चहूबाजूंनी संकटात घेरलेल्या 'आप'ला उसंत मिळणार असून विरोधी 'इंडिया' आघाडीचेही मनोधैर्य उंचावले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी तिहार तुरुंगात दाखल होताच २४ तासांच्या आत संजय सिंह यांना जामीन मिळाला.
संजय सिंह यांना अटक का?
ईडी, सीबीआयचा माफीचा साक्षीदार बनलेला व्यावसायिक दिनेश अरोराच्या विधानाच्या आधारे संजय सिंह यांना अटक झाली. अरोराने दोनदा संजय सिंह यांना २ कोटी रुपये नेऊन दिले व त्याचे डिजिटल पुरावे असल्याचा दावा ईडीने केला आहे.
सिसोदिया यांचे काय?
'आप'च्या तीन सर्वोच्च नेत्यांना अटक झालेल्या मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनाही दिलासा मिळणार काय, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, केजरीवाल व सिसोदिया मद्य धोरण निर्धारित करण्यात सहभागी असल्यामुळे त्यांचे प्रकरण संजय सिंह यांच्या प्रकरणापेक्षा काहीसे वेगळे असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.
आपली राजकीय कारकीर्द वाचवायची आणि आणखी वाढवायची असेल तर तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा महिन्याभरात ईडीकडून अटक केली जाईल, असा निरोप भाजपने आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून पाठवला आहे.
- अतिशी सिंग, नेत्या,