उत्तर प्रदेश: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. अमृत स्नानाच्या मौनी अमावस्येच्या आधी ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेमध्ये 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री 2 वाजता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. तसेच 30 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.