PostImage

Konkan News

Aug. 18, 2023   

PostImage

त्या पसार सरपंचांना अटक करा; शिवसेनेची मागणी


 

खेड : ठाकरे गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख व लोट्याचे सरपंच चंद्रकांत चाळके व बोरज गावचे प्रभारी सरपंच व बोरज गावच्या महिलांना सरपंच पदापासून वंचित ठेवणारे विशाल घोसाळकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने नामंजूर केला आहे. शासनाचे दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही सरपंच यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते पसार झाले आहेत. त्या पसार सरपंचांना तत्काळ अटक करा, अशी मागणी लावून धरणार असल्याचे युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते व शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

श्री. काते म्हणाले, बोरज गावचे प्रथम नागरिक पद भूषविणारे विशाल घोसाळकर तसेच ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा लोटे चे सरपंच पद भूषवणारे चंद्रकांत चाळके हे १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे गावात व पंचक्रोशीत दोन्ही सरपंच पसार झाल्याची जोरदार चर्चा असून दोघांनाही तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोटे जिल्हा परिषद गट व धामणदेवी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांकडे त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दोन्ही गावचे सरपंच हे ग्रामपंचायत कार्यालयात हजर नसल्याने गावाचा विकास ठप्प झाला आहे. दोन्ही सरपंचावर गंभीर आरोप असून त्याबाबत त्यांनी जनतेसमोर येऊन सत्यकथन करावे अन्यथा पोलिसांना शरण जाऊन सरपंचपद मोकळे करून बोरज येथील महिलांना संधी द्यावी. तसेच लोटे येथील सक्षम सदस्यांवर जबाबदारी सोपवावी. याबाबत शिवसैनिक आक्रमक असून जोपर्यंत दोन्ही सरपंच अटक होणार नाही, तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे अरविंद चव्हाण यांनी सांगितले.