अर्जुनी-मोरगाव: तालुक्यातील बोंडगावदेवी ते चान्ना- बाक्टी दरम्यान पुलाजवळ १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेले विश्वनाथ विठोबा काळे (४८) रा. मुंगली यांचा १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मृत्यू झाला. ते मुर्झापार्टी येथे राहत असलेल्याबहिणीकडे गेले होते तेथून परतताना हा अपघात झाला.
विश्वनाथ विठोबा काळे हे त्यांच्या बहिणीकडे मोटारसायकल (एम.एच.३५ जे ८३२५) ने कामानिमित्त गेले होते. तेथून आपल्या मुंगली या गावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात आत्माराम जयराम कापगते (५२) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बेहारे करीत आहेत.