PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 28, 2024   

PostImage

डीएड-बिएड बेरोजगार शिक्षक दिनी निवृत्त शिक्षकासह सरकारचा करणार निषेध..


 

 

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा 

 

गडचिरोली : जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद शिक्षक भरतीवर जिल्ह्यातील डीएड -बिएड झालेले बेरोजगार प्रचंड नाराज असून आज दि. 27 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील संविधान सभागृहात बेरोजगारांच्या वतीने सहविचार बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अध्यक्ष म्हणून निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्मानंद मेश्राम होते तर अतिथी म्हणून युवा कार्यकर्ते राज बन्सोड, विनोद मडावी, पत्रकार रेमाचंद निकुरे, अंकुश कोकोडे उपस्थित होते.

 

सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीविषयी बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून गडचिरोली जिल्हा हा मागास जिल्हा आहेचं पण रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा दुर्मिळ आहे. अशात शिक्षक भरतीमध्ये बेरोजगाराना डावलून सरकार निवृत्त लोकांना घेत आहे आणि इतर जिल्ह्यातील अर्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने जिल्ह्यातील युवकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बेरोजगार आता आक्रमक झाले असून जिल्हा भरातून बेरोजगार मुले एकत्रित येऊन डीएड -बिएड बेरोजगार संघटनेची स्थापना करून महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या विरोधात 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी डोळ्यावर काळ्या फिती बांधून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरु करणार आहेत. बैठकीत निवृत्त शिक्षकांना रुजू न होऊ देण्यासाठी गावागावात जाऊन ग्रामसभा व ग्रामपंचायतला ठराव घेण्यासाठी युवक आवाहन करणार असून विशेष मागास जिल्हा म्हणून भरती प्रक्रियेत ctet व tet परीक्षेची अट शिथिल करून जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे, बाहेरचे उमेदवार घेऊ नये याकरिता लक्षवेधी लढा उभा करण्यात येईल असे ठरविण्यात आले. 

जर जिल्ह्यातील बेरोजगारांचा विचार न करता बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना घेण्यात आले आणि सेवानिवृत्त शिक्षक भरती रद्द करण्यात नाही आली तर, आगामी निवडणुकीत बेरोजगार युवक प्रस्थापित भाजपा आणि काँग्रेस ला मतदान करणार नाही व वेळ आल्यास निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. 

     जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांना 5 सप्टेंबर च्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्यातील विविध तालुक्यातील बेरोजगार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.